मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून गजानन काळे फरार होते. मात्र मुंबई कोर्टाने आजच्या सुनावणीवेळी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.
आज गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. जस्टिस एस. के. शिंदे यांच्यासमोर गजानन काळे यांची सुनावणी झाली. शिंदे यांनी दोन्ही बाजू ऐकून काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याअगोदर कोर्टाने 7 सप्टेंबरपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते. आता अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने गजानन काळे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक, विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ करणे अशा आरोपांनंतर नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही. तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.
कोण आहेत गजानन काळे?
गजानन काळे हे विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी संघटनेत ते कार्यरत होते. भारतीय छात्र भारती या विद्यार्थी संघटनेतून त्यांच्या राजकीय कार्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली. फि वाढीविरोधातील आंदोलन असो, प्रवेश प्रक्रियेतील घोळ, निकाल लागण्यात होणारी दिरंगाई असो की विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो. प्रत्येक आघाडीवर काळे यांनी जोरदार आंदोलने केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी कधी विद्यापीठाच्या गेटवर तर कधी आझाद मैदानात त्यांनी आंदोलने केली. तर कधी महाविद्यालयांमध्ये घुसून महाविद्यालयांमधील मनमानी कारभारा विरोधातही आंदोलने केली.
मनसेत प्रवेश
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली. राज ठाकरे यांचा आक्रमक स्वभाव आणि भाषणशैलीवर प्रभावीत होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला. त्यात गजानन काळे यांचाही समावेश होता. त्यांनीही मनसेत प्रवेश केला. मनसेत आल्यानंतर त्यांनी कामाचा धडका लावला. गणेश नाईक यांचं नवी मुंबईवर अधिराज्य आहे. त्यातच शिवसेनाही बलवान आहे. ही सर्व आव्हाने असताना काळे यांनी नवी मुंबईत मनसेचं संघटन मजबूत करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.