मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या विचाराने हा देश मार्गक्रण करत असून गांधी विचार जगाने स्विकारलेला आहे. गांधींची अहिंसेची शिकवण हीच देशाला तारणारी आहे. मात्र, मागील ७ वर्षापासून केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारकडून गांधी विचार पद्धतशीरपणे संपवण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यभर एक संदेश जावा यासाठी एक कार्यक्रम ३० जानेवारी रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर गांधीचे विचार, अहिंसेची शिकवण, राष्ट्रीय एकात्मतेची आठवण व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन गांधींचे स्मरण करावे. मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्यासमोर सर्व पक्षांनी एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पटोले यांनी केले आहे.
३० जानेवारी हा अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या गांधींच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. गांधी विचार ही काळाची गरज आहे. हा विचारच देशाला तारणारा आहे परंतु तो विचारच संपवण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करत आहे. ‘बिटिंग द रिट्रिट’ सोहळ्यात वाजवली जाणारी ‘अबाइड विद मी’ ही महात्मा गांधी यांची आवडती धूनही आता बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच ‘मोनिका माय डार्लिंग’ या फिल्मीगाण्यावर सैन्यदलाचे जवान डान्स करतील असा व्हिडीओ केंद्र सरकारने ट्वीट केला आहे. ही सैनिकांची थट्टा करण्याचा प्रकार आहे. हे थांबवून ‘अबाइड विद मी’ हीच धून वाजवली जावी अशी काँग्रेसची मागणी आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणारा चित्रपट why I killed Gandhi ? प्रदर्शित होत आहे. गोडसेला हिरो करण्याचे काम केले जात आहे, ते आम्ही खपवून घेणार नाही. हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पंतप्रधान मोदी यांच्याकडेही पत्रादावारे मागणी करण्यात आली आहे, असे पटोले यांनी सांगितले.
केंद्र सरकारने परवाच दिल्लीतील ‘अमर जवान ज्योत’ विझवून जवानांच्या शौर्य, त्याग व बलिदानाचा अपमान केला. स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या कणखर नेतृत्वाखाली १९७१ साली पाकिस्तानला धडा शिकवून बांग्लादेशाची निर्मिती करण्याचा इतिहास घडवला. त्याची साक्ष देणारी अमर जवान ज्योत विझवली. इंदिरा गांधी यांच्यासारखे कर्तृत्व नाही म्हणून त्यांचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत उत्सव देशभर साजरा केला जात असताना ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान दिले ते देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवारहलाल नेहरू यांचा साधा उल्लेखही भाजपा सरकारने केला नाही. नेहरुंचे योगदान नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ नेहरू-गांधी यांच्या द्वेषातून त्यांना विरोध करायचा म्हणून हा ऐतिहासिक वारसा पुसला जात आहे, असेही पटोले म्हणाले.
महात्मा गांधी यांचा वारसा, स्वातंत्र्याचा इतिहास हे सगळे खोडून काढण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकार करत आहे. गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांनी केले.