स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : ‘रामदास कदम हे निष्ठावान शिवसैनिक आहेत हे तुम्हाला कुणी सांगितलं. ते किती वेळा, कुठे-कुठे जाऊन आलेत हे तुम्हाला माहीत आहे का?,’ असा प्रतिप्रश्न करत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अँटिलिया प्रकरणात कोठडीत असलेला निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यानं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात अनिल परब यांना तब्बल २० कोटी रुपये मिळाल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यानंतर अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. त्याशिवाय, परब यांच्यावर अनधिकृत बांधकामाचेही आरोप आहेत. त्याबाबतची माहिती रामदास कदम यांनीच एका आरटीआय कार्यकर्त्याच्या मार्फत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता.
रामदास कदम व आरटीआय कार्यकर्ता प्रसाद कर्वे यांच्यातील ऑडिओ संभाषणही व्हायरल झालं होतं. त्यामुळं उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, रामदास कदम यांनी स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले असून शिवसेना कधीही सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याच अनुषंगानं पत्रकारांनी आज नारायण राणे यांना प्रश्न विचारला.
रामदास कदम यांच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याकडं राणेंचं लक्ष वेधण्यात आलं. त्या प्रश्नाला राणे यांनी आपल्या खास स्टाइलनं उत्तर दिलं. ‘रामदास कदम हे निष्ठावान शिवसैनिक आहेत, असं तुम्हाला कुणी सांगितलं? किती वेळा, कुठे-कुठे जाऊन आलेत ते तुम्हाला माहीत नाही. त्यामुळं त्यांच्या विषयी प्रश्न विचारू नका,’ असं राणे म्हणाले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर झालेले आरोप पाहता त्यांना बाहेर राहण्याचा अधिकार नाही, ते तुरुंगातच असायला हवेत, असंही राणे यावेळी म्हणाले.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.