बॉलिवूडमधील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांच्यामधील वाद मिटले असून ते पुन्हा एकत्र आनंदाने राहत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान नवाजच्या कुटुंबीयांनी भारत सोडून दुबईमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
आलियाने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती परिवारासोबत लवकरच दुबईमध्ये शिफ्ट होत असल्याची माहिती दिली. ‘हो हे खरे आहे की आम्ही दुबईमध्ये शिफ्ट होत आहोत. दुबईमध्ये गेल्यावर आमची दोन्ही मुले शोरा आणि यानी तिकडेच शिक्षण घेणार आहेत’असे आलिया म्हणाली.
पुढे दुबईत राहण्यासाठी जाण्याचे कारण सांगत आलिया म्हणाली, ‘भारतात सध्या ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे आणि येत्या काही वर्षात हे असच राहणार असल्याचे आम्हाला दिसत आहे. त्यामुळे आम्ही मुलांना दुबईमधील शाळेत टाकले आहे. ऑनलाइन शिक्षण घेत असताना घरातील वातावरण ठिक नसते आणि मुले शिक्षणावर लक्ष केंद्रीत करु शकत नाहीत. शाळेत जाऊन घेतलेले शिक्षण हे फार वेगळे असते. आम्ही लवकरात लवकर दुबई जाण्याचा प्रयत्न करत आहोत.’
सध्या नवाज कुटुंबीयांसोबत कसारा येथील फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. आलिया आणि मुलांना दुबईला सोडल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी लंडनला जाणार आहे. नवाज त्याचा आगामी चित्रपट ‘हिरोपंती २’च्या चित्रीकरणासाठी लंडनला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com