मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप लावल्यापासून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. हे सगळ्याच पक्षांना माहिती आहे परंतु मी एकटा बोललो. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ विचार हवाय. जातीपातीच्या राजकारणातून आपण बाहेर पडलं पाहिजे असं विधान राज ठाकरेंनी केले होते.
राज ठाकरेंच्या आरोपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आमदार रोहित पवारांनी ट्विट करुन यावर भाष्य केले आहे. रोहित पवार म्हणतात की, साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ…’च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो असं त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय असं म्हणत रोहित पवारांनी राज ठाकरेंसह भाजपालाही चिमटा काढला आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.