स्वातंत्र्य दिन फक्त दोन दिवसांवर आला असून, देशभरामध्ये गुप्तचर यंत्रणा काही घातपाताची घटना घडून नये यासाठी कंबर कसत आहे, तर दुसरीकडे काही दिवसांआधी मुंबईमधील सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या खोट्या माहितीनंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना ताजी असतानाच, आता दहशतवादी कृत्याची आणखी एक नवीन घटना समोर आली आहे. काल सायंकाळच्या सुमारास मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एक पेट्रोलने भरलेली बाटली फेकण्यात आली आहे. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचा अंदाजही पोलिसांमार्फत वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात आरोपींचा शोधही घेत आहेत.
अज्ञातांकडून पेट्रोलची बाटली फेकली असल्याचे उघडकीस
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. या अधिकाऱ्यांना बुधवारी रात्री काही संशयास्पद वस्तू धावपट्टीच्या जवळ फेकलेली आढळली. अज्ञातांकडून पेट्रोलची बाटली फेकली असल्याचे उघडकीस आले आहे. गावदेवी झोपडपट्टीच्या लगतच संरक्षक भिंतीवरून काही वस्तू भिरकावल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सीआयएसएफच्या जवानांनी लागलीच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले होते.
संशयितांचा अद्यापही थांगपत्ता नाही
या घटनेमुळे विमानतळावरील कामकाज तसेच उड्डाणांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीआयएसएफने यासंदर्भात स्थानिक पोलिसांसह संपर्क साधला. त्यांनी संरक्षक भिंत परिसर व झोपडपट्टी परिसर पिंजून काढूनदेखील संशयितांचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही आहे.
Credits and Copyrights – May Marathi