मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून गोवा ते मुंबई मोठी फिल्डिंग लावण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करावी, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांदा नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, नितेश राणे एकदाही चौकशीला आले नाहीत.
पोलीस नितेश राणे यांच्या घरीही गेले होते. मात्र, नितेश राणे तेथेही उपस्थित नव्हते. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला नितेश राणे यांनी हजेरी लावल्यास मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते, असाही कयास बांधला जात आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथूनही अटकेची तयारी केल्याचे म्हटले जात आहे.