नवी दिल्ली : राज्यातील ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बेजबाबदारी विधाने आणि खोडसाळ राजकारण करू नये अशी तंबी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. गडकरींनी फडणवीसांबाबत गुपचूप काहीतरी सांगितले असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी दिले होते. त्यावर गडकरींकडून ही प्रतिक्रीया आली आहे.
यासंदर्भात गडकरी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवार यांच्या भाषणाची क्लिप पाहून आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे.
त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली.
विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही गडकरी यांनी केला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.