मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा देणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अलिकडेच पाठविले आहे.
गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे.हा अनुभव लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरू ठेवावीत किंवा कसे या बद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे. ही कामे आहेत त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघातांचे प्रमाण वाढेल आणि जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल. हे असेच चालत राहिले तर केवळ वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयास गांभीर्याने विचार करावा लागेल.ही कामे ‘डिस्कोप’ केली तर आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरू. तसे झाले तर महाराष्ट्राचा नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण कृपया यातून मार्ग काढावा, असे गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
गडकरी यांनी पत्रात काय म्हटले?
१.अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज २ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (१२ किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
२.या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.
३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी,कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.
Credits and Copyrights – ratnagirikhabardar.com