कल्याण दि.2 ऑगस्ट :
श्रीगणेशाच्या अर्थातच विघ्नहर्त्याच्या आगमनाला आता अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. एरव्ही दोन ते तीन महिन्यांपूर्वीच लोकांनी गजबजून जाणाऱ्या कुंभारवाड्यात मात्र यंदाही शुकशुकाटच जाणवत आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी कुंभारवाड्यातील मूर्तिकारांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यंदा तर गेल्यावर्षी जितके झालेले त्याच्या अर्धेही बुकींग झाले नसल्याने आता पुढे काय? असा प्रश्न इथल्या मूर्तिकार आणि त्यांच्या कुटुंबियांना पडला आहे.
गणेशोत्सव आणि कल्याण शहराचे जसे जुने नाते आहे. अगदी तसेच नाते गणेशभक्त आणि कल्याणच्या कुंभारवाड्याचे आहे. एकमेकांशिवाय दोघेही अपूर्णच. बरं कल्याणातील या कुंभारवाड्याची ख्याती केवळ कल्याणपुरता मर्यादित न राहता त्यावेळी आसपासच्या गावा- शहरातील हजारो गणेशभक्तांची मूर्ती घेण्यासाठी गर्दी असायची. मग ते सार्वजनिक मंडळाच्या भव्य दिव्य मूर्ती असो की घरगूती गणेशोत्सवाच्या. कल्याणच्या कुंभारवाडा लोकांच्या गर्दीने गजबलेलाच दिसायचा. मात्र काळाच्या ओघात आणि रेडिमेडच्या जमान्यात हळूहळू इथल्या गर्दीला काहीशी ओहोटी लागली.
आणि गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाने तर कुंभारवाड्यातील गणेशमूर्ती व्यवसायाच्या मुळावरच घाव घातला. इतका मोठा घाव आणि त्यामुळे झालेली जखम अद्यापही भरून निघालेली नसतानाच एकंदर परिस्थिती पाहता यंदा तर आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी हजारो गणेश मूर्तींची विक्री होणाऱ्या कुंभारवाड्यात यंदा तर गेल्या वर्षीपेक्षा अर्ध्याही मूर्तींची बुकींग झालेली नाहीये. परिणामी पुढे उदर निर्वाह कसा करायचा? या प्रश्नाने मूर्तीकार आणि त्यांचे कुटुंबिय चिंतातुर झाले आहेत. त्यामुळे सलग दोन वर्षे नुकसान सहन करणाऱ्या मूर्तीकारांचाही सरकारने विचार करण्याची मागणी मूर्तीकरांनी केली आहे.
This News has been retrieved from RSS Feed. If you Own this news please contact us for credits.