कल्याण/संघर्ष गांगुर्डे – आयुक्तांकडे घेऊन गेलेले एकही काही काम झालं नसल्याने पुढच्या वेळेस येताना आपण आता दाढी लावून येणार असा टोमणा मनसे आमदार राजू पाटील यांनी मारला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मध्ये असलेल्या देशमुख होम्स कॉम्प्लेस येथील पाणी समस्येबाबत केडीएमसी मुख्यालयात पाणी प्रश्नाबाबात विचारणा करण्यासाठी व त्यावरती तोडगा काढण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंत्याना राजीव पाठक यांनी भेट घेत पाणी पुरवठ्याबाबतच्या समस्येबाबत चर्चा केली.
त्यानंतर आमदार राजू पाटील पत्रकारांशी बोलताना देशमुख होम्स कॉम्प्लेस येथील पाणी समस्येबाबत माहिती दिली. तर या समस्येसाठी आयुक्तांना का भेटले नाही हा प्रश्न विचारले असता आमदार राजू पाटील यांनी सांगितले की आतापर्यंत आयुक्तांना शंभर पत्रं पाठवली आहेत. मात्र आयुक्त हे पत्र संबंधित विभागाला पाठवतात तेथून काही उत्तरच येत नाहीत. त्यामूळे आयुक्तांकडे न जाता थेट संबंधित विभागाकडे आलो. आतापर्यंत आयुक्तांकडे घेऊन गेलेले एकही काही काम झालं नसल्याने पुढच्या वेळेस येताना आपण आता दाढी लावून येणार असा टोमणा यावेळी मारला.
आमदार राजू पाटील यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता याची जोरदार चर्चा केडीएमसी आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे आता या टोमण्याला आयुक्त आणि सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहावे लागेल.
Credits and Copyrights – Stream7news.com