पालघर : पालघर जिल्हा मुख्यालयाचे स्वप्न सिडकोद्वारे पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे उदगार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते या जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने पार पडलं. त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.
आधी ठाणे आणि पालघर हा एकच जिल्हा होता मात्र तरीही मुंबईच्या जवळ असूनही त्याचा पुरेसा विकास काही होत नव्हता. त्यामुळे हा एक स्वतंत्र जिल्हा करण्याचा निर्णय जेव्हा शासनाने घेतला तेव्हा एक आशेचा किरण दिसू लागला. आणि आज हा जिल्हा स्थापन होऊन 7 वर्ष पूर्ण होत असताना ही सुसज्ज इमारत इथे उभी राहत आहे, हे पाहून विशेष आनंद वाटतो आहे. आज राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात कुठेही एवढे सुसज्ज जिल्हा मुख्यालय नाही ज्यात जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासकिय कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा सत्र न्यायालय अशा चारही इमारती एकाच ठिकाणी असतील. आज आपण इथे नुसती शासकीय निर्देशानुसार प्रशासकीय इमारत उभारलेली नसून एक आयकॉनिक इमारत उभी केलेली आहे. पालघरमधील जयविलास पॅलेसच्या धर्तीवर त्यचे डिझाइन तयार केले असून ते दिसायला अतिशय दिमाखदार दिसत आहे. ही इमारत नुसती प्रशस्त नसून तितकीच हवेशीर देखील आहे त्यामुळे इथे काम करणाऱ्या आणि ते घेऊन येणाऱ्या दोघांनाही एक वेगळं समाधान मिळेल. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून दोन चक्रीवादळ, कोकणातील महापूर अशी अनेक संकट आली मात्र तरीही विकासकामांचा वेग आम्ही कमी होऊ दिलेला नाही. आज या इमारतींचे काम पूर्ण करण्यात आलं असलं तरीही लवकरच शासकीय विश्रामगृह आणि कर्मचारी निवासस्थान यांचे कामही नियोजित वेळेत पूर्ण होईल असं श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. त्यासोबतच नगर परिषदेची इमारतही जुनी झालेली असल्याने त्यांचाही यामध्ये समावेश कसा करता येईल याबाबत नक्की विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालघर जिल्हा चिमाजी आप्पाच्या रक्तरंजीत क्रांतीचा वारसा सांगणारा जिल्हा असून त्यात ऐतिहासिक किल्ले, समुद्रकिनारे, आदिवासी कला आणि संस्कृती आणि जव्हार सारखा नैसर्गिक विविधतेने नटलेला प्रदेश असं अनोख सौंदर्य लाभलेला जिल्हा आहे. त्यामुळे हे जिल्हा मुख्यालय या विभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर काम होत नाही म्हणून मंत्रालयात खेटे मारायची वेळ लोकांवर येऊ नये ही खबरदारी आता या इमारतीतून काम करणाऱ्या प्रशासनाला घ्यावी लागेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेच्या पैशातून उभ्या रहात असलेल्या या इमारतीतून लोकांची काम व्हायला हवीत तेच या इमारतीचे खरे सौंदर्य असेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,कृषी मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे,गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजेंद्र गावित, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, अप्पर मुख्य सचिव संजय चहांदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार सुनील भुसारा, पालघर जिल्हा परिषदेच्या सभापती वैदेही वाढाण आणि इतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
जातपडताळणी कार्यालय देखील लवकरच पालघरमध्ये सुरू करणार
पालघर जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आले असले तरीही जातपडताळणी कार्यालय मात्र अजून इथे सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे जातपडताळणीचे पत्रक घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना आजही ठाण्याला यावे लागते. मात्र ही गरज लक्षात घेऊन लवकरच जातपडताळणी कार्यालय देखील नवीन जिल्हा मुख्यालयातील प्रशासकीय कार्यालयात सुरू करण्यात येईल अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.