पुणे : गेल्या पन्नास वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. आम्ही बोललो कि भाजप त्यात राजकारण करतंय असा आरोप आमच्यावर होतो. कर्मचाऱ्यांचे निलंबन व बडतर्फची नोटीस दिल्यावर आता सरकार एसटी महामंडळाच्या खासगीकरणाची चर्चा करीत आहे. पवारांचा एसटीच्या जागेवर डोळा असल्याने अशी चर्चा होत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. महाराष्ट्रात एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही. तोपर्यंत माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. त्यातच विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शवत आझाद मैदानात आंदोलन सुरु ठेवले आहे. तर पुण्यातही स्वारगेट, शिवाजीनगर, वल्लभनगर आगारात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. स्वारगेट येथील एसटी कर्मचारी कॉलनी येथे ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले. त्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक महिन्याचे अन्नधान्यचे किट पडळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पडळकर म्हणाले, ह्या सरकारला सत्तेचा माज आला आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. कोल्हापूरला झालेल्या एसटी अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते १५ दिवसांत एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे. तसेच २०१९ च्या जाहीरनाम्यात देखील राष्ट्रवादीने एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करू असे सांगितले होते. आता मात्र तेच विरोध करीत आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी हक्काचा लढा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर सरकार अन्याय करीत आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जात आहे. काहींचे निलंबन तर काहींची सेवा समाप्त केली जात आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांनो जागे व्हा. तुमची सेवा समाप्त करणाऱ्या सरकारचीच सेवा समाप्त करा असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.