
कल्याण दि.5 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातील सिग्नल यंत्रणेचा पुरवठा खंडीत केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. तर सिग्नल यंत्रणेचे व्यवस्थापन असणाऱ्या स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.
कल्याण – डोंबिवलीत गेल्या वर्षभरापासून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महत्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यानूसार कल्याणातील महत्वाचा रस्ता असणाऱ्या कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरातही सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र वीजबिल बाकी असल्याचे सांगत महावितरणने त्याचा वीजपुरवठा खंडीत केल्याची माहिती समोर आली आहे. (Power outage of KDMC’s signal system due to non-payment of bills)
याबाबत महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. केडीएमसीच्या लालचौकी येथील सिग्नलचे 136 दिवसांचे 11 हजारांचे बिल असून ते न भरल्याने सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तर यासंदर्भात स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. तसेच आमच्याकडे वीजबिल प्राप्त झाल्यावर आम्ही लगेचच ते भरत असतो. प्रत्येक सिग्नलचे वीजबिल न भरता सर्व सिग्नल यंत्रणेचे वीजबिल दर महिन्याला एकत्रित भरत असतो. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधणे आवश्यक होते. तसेच या संपूर्ण प्रकाराबाबत आपण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू अशी प्रतिक्रिया प्रशांत भगत यांनी एलएनएनशी बोलताना दिली.
दरम्यान अवघ्या काही हजारांच्या बिलासाठी सिग्नल यंत्रणेच्या वीज पुरवठ्यासोबत केडीएमसीचे नाकही कापले गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
This News has been retrieved from RSS Feed. If you Own this news please contact us for credits.