“निवडणुकीकरिता जातीचे राजकारण केले जात आहे, परंतु त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याची कल्पना तरी आहे का? मराठा तरुणांचे मोर्चा आज का निघाले? मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तर ते स्पष्ट सांगायचे ना? उगाच माथी भडकवण्याचे काम करू नका,” या शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला. “गेली ७४ वर्षे झाली, आपण जातीपातीत खितपत पडलो आहोत. अद्यापही रस्ते, वीज, पाणी देऊ असे म्हणत असाल तर काय कमावले? जातपात फक्त राज्यामध्ये नव्हे तर देशभरात आहे,” असे सांगत ठाकरे यांनी १९९९ च्या पूर्वीदेखील जातीपाती होत्या, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबाबतचा द्वेष वाढला याचा पुनरुच्चार केला. निवडणुकीमध्ये वॉर्डनिहाय स्त्री आणि पुरुष आरक्षण असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे दौऱ्याचा महापालिका निवडणुकीसोबत काही संबंध नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
तुमच्या भाषणाची सुरुवात शाहू-फुले-आंबेडकर यांनी कशी होते?
एकदा शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राला एकत्र आणायचे असेलच तर तो केंद्रबिंदू कोणता? राज ठाकरे यांच्या प्रश्नावर पवारांनी ’छत्रपती शिवाजी महाराज’ असे उत्तर दिले होते. मग, तुमच्या भाषणाची सुरुवात नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी न होता फुले-शाहू-आंबेडकर यांनी कशी केली जाते? तुम्ही यांचे विचार घेऊन पुढे जाणार, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ विचार घेऊन का पुढे जात नाही? असाही सवाल ठाकरे यांनी राष्ट्रवादीसमोर उपस्थित केला.
कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो समोर आणावा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे मी ब्राह्मण म्हणून नाही तर इतिहास संशोधक म्हणून जात असतो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो समोर आणावा. राजकारणाकरिता एजंट नेमले गेले. त्यांच्यामार्फत हे पसरवले जाते. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्याकरिता आला व गायब झाला. त्यामुळे हे सर्व व्यवस्थित नियोजन होते, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.
प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला कधी परवडणारे नाहीत
“महाराष्ट्राने देशाला विचार दिला असून, महाराष्ट्रामध्ये असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणामधून बाहेर पडला पाहिजे, याकरिता मी ‘ते’ विधान केले होते. यामध्ये माझ्या वक्तव्याचा व प्रबोधनकारांचा काय संबंध,” असा सवाल राज ठाकरे यांनी केला. ‘प्रबोधनकारां’ची पुस्तके वाचली आहेत का, हा प्रश्नच कुठून आला? ‘प्रबोधनकारां’चे सोयीनुसार वाचन तुम्ही करता का, असा सवाल ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. “मी काय वाचले हे मला माहिती आहे. उगाच मला मोजायचा प्रयत्न अजिबात करू नये. प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला कधी परवडणारे नाहीत. पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते कळेल, या शब्दांमध्ये ठाकरे यांनी फटकारले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.