मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांतून अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात प्रार्थनाने जागा निर्माण केली आहे. आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामुळे चाहत्यांना तिच्या या मालिकेची उत्सुकता लागली आहे.
याविषयी प्रार्थना म्हणते की, “मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. परंतु, आता जवळपास दोन वर्ष माझा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. मी अनेक वर्षांनंतर मालिका करत आहे त्यामुळे दिग्दर्शकांना मला नवीन कलाकाराप्रमाणे वागणूक देण्यासाठी बजावलं आहे कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.”
या मालिकेत प्रार्थनासोबत लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रेयसदेखील जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकही मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Credits and Copyrights – lokshahinews.com