मुंबई : देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून विशेषत: सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकीकडे लागून राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाच पैकी तीन राज्यांमध्ये निवडणूक लढणार असल्याचं पवार यांनी जाहीर केलं आहे. यावेळी, विविध मुद्द्यांवर आणि पत्रकारांच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तरे दिले. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेतील बिघाडाबाबतही त्यांनी भाष्य केलं.
पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या होत्या. त्यामुळे मोदींना पंजाबचा दौरा अर्धवट सोडून परत दिल्लीला जावं लागलं होतं. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल कऱण्यात आली होती. त्यावर, सोमवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने एक स्वतंत्र समिती नेमूण तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, हा विषय आता चौकशीसाठी प्रलंबित आहे. यासंदर्भात आज शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या प्रकरणाबाबत कालच सुप्रीम कोर्टाने एक स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. त्यातून वास्तव काय असेल ते समोर येईल. मला वाटतं, पंतप्रधानपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यासाठी केंद्र असेल किंवा राज्याने सुरक्षेची जबाबदारी घेतलीच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही असेही शरद पवार म्हणाले. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विषय गंभीर असल्याचे मी मानतो, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.