विरोधकांच्या विरोधानंतरही महापौरांचे स्पष्टीकरण
ठाणे : भाजपचा विरोध डावलून सत्ताधारी शिवसेनेने आयत्या वेळेचे विषय गदारोळात मंजुर करुन घेतले. राष्ट्रवादीनेही याचा जाब विचारला. यावेळी यापुढील महासभेत आयत्या वेळेचे विषय मंजुरीसाठी घेतले जाणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. परंतु यापूर्वी मंजुर झालेले विषय रद्द करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी झालेल्या महासभेत आयत्या वेळेचे सुमारे १० ते १२ विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले होते. त्यावरुन महासभेत चांगलाच गदारोळ झाला. नियमबाह्य पध्दतीने आणि महत्वाचे विषय नसतांना देखील विषय पटलावर आणले का जातात असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी केला. त्यामुळे नियमानुसार हे विषय पटलावर आणा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी लावून धरली. परंतु सत्ताधारी शिवसेनेकडून हे विषय मंजुर करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालत या विषयांना आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान एवढा गोंधळ सुरु असतांनाही सत्ताधारी शिवसेनेने हे विषय मंजुर केले.
दरम्यान बुधवारी झालेल्या महासभेत देखील याच मुद्यावरुन पुन्हा भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले. भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आयत्या वेळेचे विषय मंजुर का केले जातात असा सवाल उपस्थित केला. चुकीच्या पध्दतीने विषय मंजुर होतात, त्याचे गोषवारे देखील सदस्यांनी वेळेत दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. हाच मुद्दा धरुन राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी मागील तीन महिन्यात मंजुर करण्यात आलेले सर्वच आयत्या वेळेचे विषय रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. ते विषय पुन्हा नियमानुसार पटलावर आणण्याची विनंती देखील त्यांनी केली. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन यापुढे आयत्या वेळेचे विषय पटलावर घेतले जाणार नसल्याचे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. परंतु यापुर्वी घेण्यात आलेल्या विषयांचे काय असा सवाल पुन्हा मुल्ला यांनी उपस्थित केला. ते विषय मंजुर झालेले आहेत, त्यामुळे ते रद्द करता येणार नसून परंतु यापुढे नवीन विषय घेतले जाणार नसल्याचे महापौर म्हस्के यांनी स्पष्ट केले.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.