राज्यामधील सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट, दुकाने, मॉल्स येत्या १५ ऑगस्टपासून दररोज रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. इनडोअर खेळ, मंगल कार्यालये यांनादेखील मुभा देण्यात आली आहे, परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मंदिरे, प्रार्थनास्थळे, मल्टिप्लेक्स आदी सध्या तरी बंदच राहणार आहेत. स्वातंत्र्य दिनापासून बऱ्याच निर्बंधांमधून मुक्ती मिळत असल्यामुळे व्यापारी वर्गाला मात्र आता मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या निर्णयांची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. बऱ्याच काळापासून कोरोना विषाणूचा सामना करीत असलेल्या व्यावसायिकांना मात्र या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
कमी उपस्थितीत व विविध शिफ्टमध्ये खासगी कार्यालये सुरू
शॉपिंग मॉल्स, दुकाने, बार, हॉटेल्स सर्व दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. त्याबरोबरच रेस्टॉरंट, हॉटेल्स ५०% क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवता येणार आहेत. खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या २४ तास चालू ठेवता येतील. त्यामुळे कमी उपस्थितीमध्ये व विविध शिफ्टमध्ये खासगी कार्यालये सुरू राहू शकणार आहेत. मंगल कार्यालयांना ५०% क्षमतेने आणि जास्तीत जास्त शंभर नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडण्यास मुभा दिली आहे. खुल्या लॉनमधील लग्न सोहळ्यास दोनशे लोकांच्या उपस्थितीस मुभा देण्यात आली आहे. टेबलटेनिस, बॅडमिंटन यांसारख्या इनडोअर खेळांनासुद्धा मुभा देण्यात आली आहे.
तिसरी लाट सुरू होताच पुन्हा टाळेबंदी होणार
राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू होताच ज्या दिवशी रुग्णांना ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्या स्थितीत लॉकडाऊन लावून परत निर्बंध लागू केले जाणार आहेत. यासंदर्भात निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले, राज्यामध्ये सध्या उद्योगांमार्फत १५०० ते १६०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उत्पादित केला जात आहे. दुसरीकडे, राज्यामध्ये ४५० पीएसए प्लांट उभारण्यात येत आहेत. त्यामधील १४१ प्लांट सुरू झाले आहेत. येत्या महिनाभरामध्ये आणखी २०० प्लांट कार्यान्वित होणार आहे. सर्व पीएसए प्लांट कार्यान्वित झाल्यानंतर राज्यामध्ये दररोज ४०० ते ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होईल.
व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा
दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट ५०% क्षमतेने चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले पाहिजे. शॉपिंग मॉल्समध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. मंगल कार्यालयांना ५०% क्षमतेत शंभर नागरिकांच्या उपस्थितीला मुभा, तर खुल्या लॉनमध्ये लग्न सोहळ्याकरिता दोनशे लोकांच्या उपस्थितीस मुभा देण्यात आली आहे. खासगी कार्यालये, आस्थापना, कंपन्या २४ तास सुरू ठेवता येणार, तर बॅडमिंटन, टेबलटेनिस आदी इनडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे. जिम्नॅशियम, योग सेंटर, सलून व स्पा ५०% क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सर्व दिवस सुरू ठेवण्यात येणार आहेत. राज्यामधील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेनुसारच चालू राहणार आहेत.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com