स्रोत: रत्नागिरी खबरदार रायगड : कोविड-19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक कुटुंबांनी दुर्देवाने आपल्या जीवाभावाची माणसे गमावली. या दरम्यान शासनाने नागरिकांसाठी आरोग्याच्या सोयी-सुविधा देण्यासाठी व या सोयी- सुविधांमध्ये अधिक वाढ करण्याचे सर्वप्रकारे प्रयत्न केले. नंतरच्या टप्प्यात अथक प्रयत्नांनी लसीकरण मोहीम जोरदार राबविली. मात्र रायगड जिल्ह्यात लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद मिळण्याची क्षमता असताना नागरिकांचे अजूनही 100 टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना भाऊबीजेला लसीकरणाची ओवाळणी द्या, असे भावनिक आवाहन केले आहे.
रायगड जिल्ह्यात 18 लाख 63 हजार 470 इतक्या नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून 7 लाख 81 हजार 648 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. अद्याप 10 लाख 81 हजार 822 इतके नागरिक दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षेत आहेत. तसेच पहिला डोस घेतल्यानंतर 28/84 दिवसांच्या विहित कालावधीनंतर (कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर 28 दिवस व कोविशिल्ड लस घेतल्यानंतर 84 दिवस ) दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या 1 लाख 13 हजार 889 आहे.
जिल्ह्यात आवश्यक त्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी आणि पहिला डोस घेतल्यानंतर 28/84 दिवसांच्या विहित कालावधीनंतर (कोव्हॅक्सिन लस घेतल्यानंतर 28 दिवस व कोविशिल्ड लस घेतल्यानंतर 84 दिवस ) दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी आपण राहता त्या परिसरातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, तहसिलदार किंवा प्रांताधिकारी यापैकी कोणाशीही संपर्क साधून कोणत्याही परिस्थितीत पुढील काही दिवसात आपले कोविड लसीकरण तात्काळ करून घ्यावे, नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही नागरिकांना प्रोत्साहन द्यावे, एनसीसी, एनएसएस, नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, मित्रमंडळ, सामाजिक संस्था, जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी संस्था, कंपन्या यांनीही सामाजिक कर्तव्य भावनेतून आपआपल्या क्षेत्रातील, परिसरातील नागरिकांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.