कोरोना विषाणूच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांचे ओळखपत्र तपासून त्यांना मासिक पास देण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत १८ हजारांहून जास्त नागरिकांची पडताळणी पूर्ण झाली, तर पहिल्या सत्रामध्ये रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून १७ हजार ७५८ मासिक पासचे वितरण करण्यात आले. मुंबईमधील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष चालू करण्यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकांवर भेटी देऊन या प्रक्रियेची पाहणी केली, तसेच ऑफलाईन पडताळणी करताना लोकल प्रवासी व मदत कक्षावरील कार्यरत कर्मचारी यांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, या दृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला महापौरांनी यावेळी दिला.
सेतूवर माहिती असताना हा पडताळणीचा घाट का घातला जात आहे?
रेल्वेच्या प्रवासाकरिता १५ ऑगस्टपासून देण्यात येणाऱ्या पासकरिता कोरोना लसीकरणाची पडताळणी केली जात आहे, परंतु आरोग्य सेतूवर माहिती उपलब्ध असताना पडताळणीचा घाट का?, असा सवाल प्रवासी विचारत आहेत. रेल्वे प्रवासी सिद्धेश देसाई म्हणाले, कोरोना लसीकरणाची पडताळणी केली जात आहे. लसीकरण केल्यासंदर्भात आरोग्य सेतू ॲपवर सर्व माहिती उपलब्ध आहे. त्या माहितीचा वापर करता आला असता, परंतु विनाकारण प्रवाशांचा वेळ वाया घालवला जात आहे आणि सेतूवर माहिती असताना हा पडताळणीचा घाट का घातला जात आहे? रेल्वे प्रवासी प्रसाद पाठक म्हणाले, आता सगळीच कामे पूर्णपणे चालू झालेली नाहीत. काही जणांना आठवड्यातून एकदा, तर काही जणांना ३-४ वेळा बोलावले जाते. काही जण महिन्यातून १-२ वेळाच बाहेर जातात. असे असताना त्यांनी महिन्याभराच्या पासकरिता पैसे का खर्च करावेत? पहिल्या सत्रामध्ये १७ हजार ७५८ मासिक पास देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या माध्यमातून १२ हजार ७७१, तर पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या ४ हजार ९८७ मासिक पासचा समावेश करण्यात आला आहे. दररोज सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सतत दोन सत्रांमध्ये मदत कक्ष कार्यरत असणार आहेत. यामुळे विनाकारण गर्दी न करता नागरिकांनी आपल्या घराजवळील रेल्वे स्थानकांवर पडताळणीसाठी जावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
जवळच्या रेल्वे स्थानकावर जाण्याचे आवाहन
लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांच्या कोरोना लसीकरणाची पडताळणी रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून बुधवारी करण्यात आली. मोबाइलमधील पीडीएफ फाइलवरूनही पडताळणी जलद होत होती, परंतु जे लोक झेरॉक्स घेऊन आले होते त्यांची प्रत स्कॅनिंग करण्याकरिता उशीर लागत होता. बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५३ रेल्वे स्थानकांवर ३५८ मदत कक्ष चालू करण्यात आले आहेत. पडताळणीकरिता ज्या नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याच्या वैध प्रमाणपत्राची प्रत, त्यासह छायाचित्र ओळखपत्र पुरावा, असे दोन्ही दस्तावेज सोबत घेऊन जवळच्या रेल्वे स्थानकावर जाण्याचे आवाहन पालिकेने केले होते.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com