राज्यात गेल्या १४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एसटीच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिक देखील वेठीस धरले गेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा आणि कामगारांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता मध्यस्थी करणार आहेत. राज ठाकरे नुकतेच एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ‘सिल्वरओक’ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आता संप मिटणार का? शरद पवार याबाबत कोणतीही भूमिका घेतात? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. (Raj Thackrey to meet Sharad Pawar)
एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं कालच ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेत त्यांना आत्महत्या थांबवण्याचं आवाहन केलं होतं. तुम्ही आत्महत्या थांबवल्या तरच मी सरकारशी बोलेन अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यानुसार आज दुपारी साडेपाच वाजता राज ठाकरे सिल्वरओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी एसटी कर्णचाऱ्यांचं शिष्टमंडळ देखील राज ठाकरे यांच्यासोबत आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.