मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ओळख दिलखुलास व रोखठोक व्यक्तिमत्वाकरिता आहे. आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या सौंदर्याचे वर्णन राज ठाकरे यांनी केले. ‘या वयात देखील आशाताई काय दिसतात ना…’ असे राज म्हणाले. राज ठाकरे यांच्या विधानानंतर ते स्वत:ही हसले व उपस्थितांमध्ये हशा पिकला.
राज ठाकरे यांनी दिलखुलासपणे भाषण केले
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे हे शंभर व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. त्याच निमित्ताने पुण्यामध्ये खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खुद्द बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, राज ठाकरे, आशिष शेलार, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी दिलखुलासपणे भाषण करताना आशा भोसले यांच्या सौंदर्याचे कौतुक केले, तर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे उत्तुंग पैलू उलगडून सांगितले. राज ठाकरे म्हणाले, कोण म्हणेल आशाताई आता अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या आहेत. या वयामध्ये सुद्धा काय दिसतात ना. अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू होती. मी म्हटले आपण जाहीरपणे सांगावे, असे मिश्किलपणे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे, आशाताई येथे मंचावर बसलेत. आपण केवळ यांच्या वयाचे आकडे मोजायचे. याच्यापलीकडे आपल्या हातामध्ये काही नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात नवीन पद्धतीने केली
जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी राज ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात आता लोकांच्या सहज अंगवळणी पडली आहे, परंतु आज राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात नवी केली. अर्ध्या झाकलेल्या अन् अर्ध्या उघड्या असलेल्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो, असे म्हणतच राज ठाकरे यांनी आजच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केले.
बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा
“सहा वर्षांचा असताना मी पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिले होते. त्याच्यानंतर कित्येक वर्षे मी त्यांना केवळ पाहत होतो, वाचत होतो आणि आता मला त्यांचा सहवास लाभला. बाबासाहेब इतिहास जरी सांगत असले, तरीही ते वर्तमानामध्ये भानावर यायला शिकवतात. इतिहासात ज्या चुका केल्या, त्या वर्तमानात करू नये हे सांगतात.” “इतिहासासोबत वर्तमानाच्या जगात आणणारा इतिहास बाबासाहेब सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वावच नाही. शिवचरित्र बऱ्याच जणांनी लिहिली, परंतु बाबासाहेबांनी ते घराघरांत आणि मनामनात पोहोचवले. बाबासाहेब तुम्ही असाच इतिहास सांगत रहा. आमची नातवंड, पतवंड तुमच्यामार्फत असाच इतिहास ऐकतच राहतील”, अशी इच्छादेखील व्यक्त करून राज ठाकरेंनी बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Credits and. Copyrights – May Marathi