कल्याण डोंबिवली यामधून आपल्या खाजगी वाहनाने कुठे जायचे म्हटले की, शिळफाटाच्या ट्रॅफिकचा विचार करून आधी पोटात गोळा येतो… कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील हे सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करताना दिसतात. मात्र प्रशासनाकडून हवा तसा तोडगा अद्याप निघत नाही. उद्या १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनानिम्मित अनेक कार्यक्रम देशभरामध्ये साजरे केले जातात. या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी येथील स्थानिकांच्या वतीने ठाणे वाहतूक प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा विभाग यांना ट्विट करून या वाहतूककोंडीमधून जनतेला स्वातंत्र्य कधी मिळणार ? असा सवाल विचारला आहे. त्याबरोबरच ठाणे पोलीस यांना उद्देशून ठेकेदार टक्केवारी मध्ये सुस्त, तर वाहतूक पोलीस हफ्ते घेण्यामध्ये सुस्त अशाप्रकारे टोला हाणला आहे.
याआधी ५ ऑगस्ट रोजी कल्याण-शिळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने चालू असल्याचे राजू पाटील यांनी प्रशासनच्या निदर्शनास आणून दिले होते. पलावा ते सुयोग हॉटेल चौकापर्यंतच्या मार्गावर तीन महत्त्वाचे जंक्शन्स आहेत. मानपाडा चौक, सुयोग हॉटेल, कुशाला हॉटेल या तिन्ही भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. याच वाहतूक कोंडीला कारणीभूत असणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याच्या सूचना यावेळी एमएसआरडीसी अधिकारी व वाहतूक पोलिसांना केल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. रस्त्याच्या कामात राहून गेलेल्या त्रुटी असतील तर त्या तातडीने दूर केल्या जातील, असे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी यावेळेस सांगितले. ठाणे जिल्ह्यामधील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी कल्याण शीळ रस्ता असून गेल्या बऱ्याच दिवसांपासून येथील काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला सुद्धा तडे गेले आहेत. त्यातच निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
Credits and. Copyrights – May Marathi