मुंबई : खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर ठाकरे सरकारकडून कारवाईत दिरंगाई होत असल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार रामदास कदम यांनी शुक्रवारी स्वपक्षाला घरचा आहेर दिला. गेल्या काही दिवसांपासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील कलहामुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत ठाकरे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. वैभव खेडेकर यांच्यावर दोन महिने उलटूनही नगरविकास खात्याने कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा भ्रष्टचाारी माणसाला पाठिशी का घातले जात आहे? तो सरकारचा जावई आहे का?, असा थेट सवाल रामदास कदम यांनी विचारला. तसेच नगरविकास खात्याने वैभव खेडेकर यांच्यावर कारवाई केली नाही तर मी सरकारविरोधात न्यायलयात जाईन, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. त्यामुळे आता यावर शिवसेना आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रामदास कदम यांनी आज सभागृहात वैभव खेडेकर यांच्या कथित भ्रष्टाचाराचा तपशील सादर केला. वैभव खेडेकर हे खेड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आहेत. त्यांनी बौद्धवाडीसाठी पूल बांधण्याच्या नावावर २० लाखांचा निधी शासनाकडून घेतला. मात्र, या निधीचा वापर एका खासगी इमारतीकडे जाण्यासाठीच्या पूलासाठी करण्यात आला. चौकशीत ही बाब उघड झाली होती. याशिवाय, आणखी ११ प्रकरणांमध्ये वैभव खेडेकर यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले होते
त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी २० प्रस्ताव पाठवण्यात आले होते. यापैकी ११ प्रस्तावांमध्ये खेडेकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, असे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याला तसा अहवाल पाठवला होता. यावर १५ दिवसांत कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही नगरविकास खात्याने हा अहवाल दाबून ठेवला आहे. वैभव खेडेकर यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झालेय तर त्याला पाठिशी का घातले जात आहे? तो तुमचा जावई आहे का? त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा सोडून त्याला पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. ही कारवाई टाळण्यासाठी कोणत्या पक्षाकडून आणि नेत्याकडून दबाव येत आहे, हे मला ठाऊक आहे. पण सरकारने वैभव खेडेकरवर कारवाई केली नाही तर मी दाद मागण्यासाठी न्यायालयात जाईन, असे रामदास कदम यांनी सांगितले.
रामदास कदम यांचा नेमका आरोप काय?
वैभव खेडेकर यांनी शासनाचा २० लाखांचा निधी वापरुन पूल बांधला. हा पूल बौद्धवाडीसाठी हवा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ज्या नाल्यावर हा पूल बांधण्यात आला त्याचा उपयोग बौद्धवाडीला होत नाही, हे गावकऱ्यांनी कबूल केले आहे. या पुलाचा वापर एका खासगी इमारतीसाठी होतो. या इमारतीमध्ये वैभव खेडेकर यांच्या पत्नीचे चार फ्लॅटस असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. तसेच वैभव खेडेकर यांनी त्यांना वाहनांच्या इंधन खरेदीसाठी एक लाखांची मर्यादा ठरवून दिली असताना साडेतीन लाखांची उधळपट्टी केली. एवढेच नव्हे तर बंद पडलेल्या सरकारी गाड्यांच्या नावावर त्यांनी खासगी वाहनांसाठी इंधनाचे पैसे मिळवले, असा आरोपही कदम यांनी केला.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.