देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. देशभरामधून दिग्गज नेत्यांनी सीतारामन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये अर्थमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना पेट्रोल व डिझेलच्या वाढीव किंमतीवर त्यांनी भाष्य केले आहे.
देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यांच्यावर बऱ्याचदा टीका झाली
निर्मला सीतारामन यांच्या रूपाने भारताला पहिल्या महिला अर्थमंत्री मिळाल्या आहेत. नोटाबंदी, जीएसटीसारखे वादग्रस्त निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले होते. त्यामुळे सीतारामन अर्थमंत्री झाल्यावर मोडलेल्या अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. सीतारामन यांना आतापर्यंत विरोधकांच्या अनेक टीका झेलाव्या लागल्या आहेत, परंतु आपल्या शांत स्वभावामधून व कामातून त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यांच्यावर बऱ्याचदा टीका झाली आहे.
आयुष्याचे शतक पार करावे, रोहित पवार यांचा खोचक टोमणा
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत चाललेले आहेत. किंमत आटोक्यात येणार नाही, अशी कटू घोषणा त्यांनी वाढदिवसाच्या एकच दिवसांपूर्वी केली. त्यावरून आता सीतारामन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खोचक टोमणा आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. देशाची तिजोरी सक्षमपणे सांभाळणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपण पेट्रोल-डिझेलच्या दराप्रमाणे आयुष्याचे शतक पार करावे. त्याकरिता आपणास चांगले आरोग्य लाभावे, ही प्रार्थना!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
उत्पादन शुल्कामध्ये कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. देशामध्ये इंधन दरवाढीने सामान्य जनता मात्र त्रस्त आहे. पेट्रोलने बऱ्याच राज्यांमध्ये शंभरी पार केली आहे. त्यामध्येच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधनाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता कमी आहे, असेही सांगितले आहे. उत्पादन शुल्कामध्ये कोणतीही कपात केली जाऊ शकत नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. याला सर्वस्वी काँग्रेसप्रणित यूपीए सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.