मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खान याला अटक झाल्यानंतर आणि मंत्री नवाब मलिक यांच्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे चांगेलच चर्चेत आहेत. नवाब मलिकांकडून वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना दुसऱ्या बाजूला आता वानखेडे यांच्या समर्थनार्थ देखील काही संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. मुंबईतील एनसीबी कार्यालयाबाहेर आज शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान नावाच्या संघटनेनं वानखेडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
इतकंच नव्हे, तर समीर वानखेडे कार्यालयात दाखल होत असताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तसंच वानखेडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा जंगी सत्कार देखील करण्यात आला.
‘समीर वानखेडे तुम आगे बढो…हम तुम्हारे साथ है’, ‘हर हर महादेव’ या घोषणांनी एनसीबी कार्यालयाबाहेर शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वानखेडेंचा सत्कार केला. तसंच ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई करुन समीर वानखेडे चांगलंच काम करत आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम काही जण करत आहेत. पण आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहोत, असं शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यानं सांगितलं.
समीर वानखेडे यांनीही शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केलेला सत्कार स्वीकारला आणि त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी वानखेडेंनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यलयीन वेळेत एनसीबीच्या कार्यालयात पोहोचले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.