मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीनंतर वादात सापडलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ येत्या ३१ डिसेंबररोजी संपत आहे. त्यामुळे एनसीबी वानखेडे यांना मुदतवाढ देते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास एनसीबीकडे आल्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबईतील ड्रग्ज रॅकेट उघड़कीस आणत धडक कारवाई सुरू केली. वानखेडे यांना ऑगस्ट २०२१ पर्यंत संचालकपदी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा एनसीबीने मुदतवाढीचा आदेश काढत वानखेडे यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत चार महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. मात्र क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर वानखेडे आरोपांच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.
एनसीबी आणि मुंबई पोलिसांनी विशेष पथके स्थापन करून आरोपांची चौकशी सुरू केली आहे. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाही वानखेडेंकडून ड्रग्ज तस्करांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे वानखेडे यांना मुदतवाढ मिळणार की बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.