मुंबई : राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते. त्यामुळे, वानखेडे आणि मलिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. आजपर्यंत शांत असलेल्या समीर वानखेडेंच्या वडिलांनीही आता नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. जावयाला आत टाकल्यामुळेच नवाब मलिक माझ्या मुलाच्या मागे लागलेत, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटलंय.
नवाब मलिक यांचे आरोप फेटाळत समीर वानखेडे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती. माझी खासगी कागदपत्रे अशाप्रकारे ट्विटरवर टाकणे अपमानास्पद असल्याचे म्हणत समीर वानखेडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही एका वृत्त वाहिनीशी बोलताना नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.
माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे, माझं नाव दाऊद कसं झालं हे मला माहिती नाही. जावयाला आत टाकल्यापासून मलिक समीरच्या मागे लागलाय. तो मंत्री आहे, सरकारच त्याचं आहे, मग तो काहीही करू शकतो. नाव बदलू शकतो, जन्म दाखलाही बदलू शकतो, असे म्हणत ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या वर्तणुकीवर टीका केली आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.