सिंधुदुर्ग : राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी राजेंद्र दाभाडे आज सकाळी कणकवलीत दाखल झाले आहेत.
मात्र अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल हे प्रतिवर्षी डिसेंबर अखेर होणाऱ्या डीवायएसपी, पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणीसाठी कणकवलीत दाखल झाले असल्यची माहिती उपलब्ध झाली आहे. आज सकाळी लवकर डीवायएसपी कार्यालयात दाखल होत त्यांनी माहिती घेत वार्षिक तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यांना सुद्धा ते भेट देण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या कणकवलीतल्या आगमनामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
सिंधुदुर्गातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कणकवली हॉटस्पॉट ठरत आहे. सध्या जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपाना उधाण आले आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंना अटक करण्याचा डाव महाविकास आघाडीचे नेते करत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल केला तर आमदार नितेश राणे यांनी आपल्याला या प्रकरणात गुंतवण्याचा नाहक प्रयत्न होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
तर, दुसऱ्या बाजूला आमदार संतोष परब प्रकरणातल्या मुख्य सूत्रधाराच नाव जाहीर करा, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.