शेअर बाजारानं मोठी उसळी मारली असून सेन्सेक्स पहिल्यांदाच 56 हजारांच्या पार गेला आहे. गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारात सध्या जोरदार खरेदी केली जात आहे. बँकिंग, आयटी आणि वित्तीय पुरवठादार कंपन्यांच्या शेअर्सला सर्वाधिक मागणी असल्याचं दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सेनसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आज सर्वाधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सनं 56 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर निफ्टीनं 16 हजार 701 पर्यंत झेप घेतली आहे. बॅकिंग शेअर्स आणि आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आज सकाळी शेअर बाजार उघडताच निफ्टिनं 16 हजार 678.95 अंकांपर्यंत मजल मारली. त्याच वेळी सेन्सेक्स 56 हजारापर्यंत पोहोचला होता. एचडीएफसी बँकेला क्रेडिट कार्डची परवानगी दिल्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या विक्रीमध्ये तब्बल 3.07 टक्क्यांची घसघशीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. एचडीएफसी बँकेपाठोपाठ टायटन, पॉवर ग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट यांच्या शेअर्सनी चांगली कमाई केली. तर दुसरीकडे टाटा स्टील, इंडसइंड बँक, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्सला फटका सहन करावा लागला.
दरम्यान, काल रिझर्व्ह बँकेनं तब्बल 8 महिन्यांनंतर एचडीएफसी बँकेला ग्राहकांसाठी पुन्हा क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम देखील शेअर बाजारात दिसून आल्याचं मत अभ्यासकांच्या वतीनं व्यक्त केलं जात आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.