मुंबई : महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, विविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला देशात ऐक्य नको हे शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वीच सांगितले होते, असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. नेमकचि बोलणे हे पुस्तक आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायला हवे, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला.
महाविकास आघाडीचा जो आपण ग्रंध निर्माण केला आहे त्याला भगवे कव्हर आपण घातले आहे, त्याबद्दल आभारी आहे. हे सरकार अवघा रंग एकची झाला असे आहे. नेमकचि बोलणें हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायला हवे. कारण महाराष्ट्र हा सतत देशाला काही विचार देत असतो. शरद पवार यांच्या ६१ भाषणाच्या या पुस्तकाची प्रत आपण पंतप्रधानांना देऊ. नेमकचि बोलणें याची फोड करुन त्यांना सांगू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
आपल्या देशामध्ये जे विकृत राजकाराण सुरू आहे, त्यावरसुद्धा शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहे. भाजपला देशाचे ऐक्य नको आहे, हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की, भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे, हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, सोशल मीडियावर शरद पवारांना दिल्लीत खुर्ची बसायला दिली, त्यावरुन फार टीका करण्यात आली. पण त्यांना बसण्यासाठी खुर्ची का दिली, हे समजून घ्यायचे असेल, त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते, त्यांनी हा ग्रंथ वाचल्यावर कळेल माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे, असे स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी यावेळी दिले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.