मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने कामगारांची पगारवाढ केली आहे. तर विलिनीकरणाची मागणी हायकोर्टाच्या कमिटीने रिपोर्ट सादर केल्यावर त्यानुसार सकारात्मक निर्णय घेऊ अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांची ऐतिहासिक पगारवाढ करत असल्याची घोषणा केली. ही घोषणा करत असतानाच अनिल परब यांनी संप मागे घेण्याचं आवाहन कर्मचाऱ्यांना केले परंतु आता सरकारच्या पगारवाढीच्या घोषणेनंतर कर्मचारी संप मागे घेतील का? असा प्रश्न आहे. कारण कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाची मागणी लावून धरली आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पगारवाढीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, सरकारनं घाणेरडं राजकारण केले. आमची मागणी विलिनीकरणाची आहे. पगारवाढीची नाही. वरिष्ठ श्रेणीला अडीच हजार आणि कनिष्ठ श्रेणीला ७ हजार पगारवाढ आहे. २ आमदारांचीही फसवणूक केली. विरोधी पक्षाने कर्मचाऱ्यांचा आवाज विधानसभेत मांडावा. ४० एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यावर शरद पवार गप्प बसले. कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचा खून करण्याचं काम शरद पवारांनी केले. सरकार किती असंवैधानिक असू शकतं हे अनिल परब यांनी मान्य केले. पगार वेळेवर न देणारं सरकार किती खोटं बोलू शकतं हे दिसून येते.
विलिनीकरण करण्याचा निर्णय घेऊ नका असं न्यायालयाने म्हटलं नाही असं त्यांनी सांगितले. तसेच एसटी कर्मचारी कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोवर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार आहे. सरकारने महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांचा अपमान केला आहे. ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या प्रेतावर सरकारनं तांडव करण्याचं पाप केले आहे अशी टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.