मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यभरात निषेधाचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहे. डोंबिवली शहर शिवसेना शाखेच्या वतीने कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख राजेश मोरे, युवासेनेचे सागर जेधे, राजेश कदम, राहुल म्हात्रे आदी शिवसैनिकांनी इंदिरा गांधी चौकात कोंबड्या उडवून नारायण राणेंचा निषेध केला.
शिवसैनिक व पोलीस यांच्यात झटापट
यावेळी कोंबड्या पकडण्याकरिता शिवसैनिक व पोलीस यांच्यात झटापट झाली. जेधे यांनी राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर आणखी एक पुतळा शिवसैनिकांनी आणला खरा, मात्र तो फाडण्यात आला. त्यावर राणेंची छबी असून त्या छबीला फाडण्यात आले.
मुख्यमंत्र्यांबद्दल विधान खपवून घेतले जाणार नाही
सदानंद थरवळ यांनी जमावाला आवाहन करताना राणेंच्या वक्तव्याचे अजिबात समर्थन नाही, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत विधान खपवून घेतलेच जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर असे व्यक्तव्य करू नये, त्याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
राणे यांनी डोंबिवलीत पाऊल ठेवू नये
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही चालू केल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. राणे यांनी डोंबिवलीत पाऊल ठेवू नये, ठेवल्यास त्यांच्या स्वागताची तयारी केली जाईल, असेही खुले आव्हान शिवसेना महिला शहर आघाडी, रणरागिणी वैशाली दरेकर, कविता गावंड, मंगला सुळे आदींनी केले आहे. मोरे, जेधे आदींना रामनगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.