श्रीवर्धन : गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अलीकडील काळात महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद जाहीरपणे बोलला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेच्या एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे
श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, या शब्दांत गीते यांनी निशाणा साधला.
शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे, हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपले सरकार आहे. आपले कशासाठी म्हणायचे तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेचे नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपले गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असे गीते म्हणाले.
दोन्ही काँग्रेस कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मते नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असे अनंत गीते यांनी म्हटले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.