सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
शिवसेना महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राणे पिता-पुत्रांना टोला लगावला आहे.
निकष बाजूला ठेवून आमदार नितेश राणे यांची जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदी झालेली निवड अयोग्य आहे, अशी टीका कणकवली नगरपंचायतीचे विरोधी पक्षगटनेते आणि जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी शुक्रवारी केली.
आमदार नितेश राणे हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार आहेत. तसेच ते जिल्हा बँकेचे मतदारही नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तीला जिल्हा बँकेचे स्वीकृत संचालक बनविणे ही योग्य बाब नाही असे श्री. नाईक म्हणाले.
नाईक पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आर्थिक दर्जा उंचवावा, त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, बँक ग्राहकांची प्रगती व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेत तज्ञ व्यक्तीची स्वीकृत संचालकपदी निवड केली जाते. मात्र आज जिल्हा बँकेच्या बैठकीत झालेल्या स्वीकृत संचालक या निवडीकरिता स्वीकृत संचालक निवडीचे निकष बाजूला ठेवण्यात आले. सत्ताधारी संचालक पॅनलकडून चक्क आमदार नितेश राणे यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले.
ते म्हणाले, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम खंड ११ मधील तरतूदीनुसार तज्ज्ञ संचालक याचा अर्थ बँकिंग, व्यवस्थापन, सहकार व वित्त व्यवस्था या क्षेत्रामधील अनुभव असलेली व्यक्ती असा आहे. त्यामध्ये संबंधित संस्थेने हाती घेतलेली उद्दिष्टे व कार्य यांच्याशी संबंधित अन्य कोणत्याही क्षेत्रातील विशेषज्ञता धारण करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जरी राणे समर्थक प्रणित पॅनलला बहुमत मिळाले, तरी निवडीनंतर जिल्हा बँकेत राजकारण असू नये हे आमचे मत आहे. मात्र ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती केली गेली. ती पाहता येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राणे समर्थकांच्या राजकारणाचा अड्डा बनवू नये, अशी अपेक्षा आहे, असे श्री. नाईक शेवटी म्हणाले.