मुंबई : एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र दुसरीकडे महामंडळाकडून आतापर्यंत २५७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला उत्तर न देणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
१०,४५१ कर्मचारी निलंबित
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २७ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्या दृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे नोटीस बजावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २५७ झाली आहे. एसटीतील १११ कर्मचाऱ्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या एकूण १०,४५१ वर पोचली आहे.
रोजंदारीवरील २,०४३ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती
नियमानुसार, निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम पंधरा दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर तीन वेळा सुनावणीसाठीही हजर राहण्याच्या सूचना असतात. त्यालाही प्रतिसाद न दिल्यास बडतर्फीची कारवाई करण्याच्या दृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. त्यानुसार आतापर्यंत रोजंदारीवरील २,०४३ कर्मचाऱ्यांचीही सेवा समाप्ती केली आहे
एकूण २,६२४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
दरम्यान विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपात सामिल असलेल्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणीही बदल्या केल्या जात आहेत. बुधवारी ५२ कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. एकूण २,६२४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असल्याचीही माहिती मिळत आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.