सिंधुदुर्ग : गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी नेते नवाब मलिक भाजपवर सातत्याने टीका करत असून, दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असून, महाविकास आघाडीकडे विकासाची दृष्टी नाही. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी अवस्था, असा खोचक टोला लगावला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे विकासाची कोणतीही दृष्टी नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था आहे, असा प्रहार नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
राज्यात अनेक प्रश्न आहेत. तरीही या सरकारला त्याचं काही पडलं नाही. हे सरकार अधिवेशन घेण्याच्या मानसिकतेत नाही. हे आजारी सरकार आहे. आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास फंड कमीच होत चालला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय हे स्पष्ट होते. सिंधुदुर्गाला ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, ती अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात वादळ आले, अतिवृष्टी झाली तरी दखल घेतली जात नाही. पुरेसे पैसे दिले जात नाहीत. विकासाला चालना मिळेल असे बजेट या नियोजन समितीकडे नाही. आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे असे या सरकारचे धोरण आहे. जिल्हा परिषदेसाठी सरकारने ४६ कोटी रुपये दिले होते. पण नंतर विभागीय चौकशीची धमकी देऊन जिल्हाधिकाऱ्याकडून ते परत मागवून घेतले, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
अलीकडेच राज्यातील काही भागात दंगली उसळल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्र धगधगतोय त्याचे खापर भाजपवर फोडण्याचे कारण नाही. दंगलीला कोण कारणीभूत आहे आणि या सर्व गोष्टींकडे सरकार काय दृष्टीने पाहते हे सर्वांना माहीत आहे. राज्यात अशांतता राहू नये म्हणून आमचे नेते प्रयत्न करत आहेत. विकासाच्या कामात खोडा घालायचा नाही. या विषयावर कधी बोललो नाही, असे नारायण राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.