अर्थात प्रत्येक केसमध्ये ‘धमणीकाठीण्य’ असेलच असं नसलं तरी दहापैकी आठवेळा तरी ते असण्याची दाट शक्यता असते..
‘तरुण वयात झोपेतच जाणं’ ही एवढ्या सहजासहजी होणारी प्रक्रिया नाही..यापलिकडं फुफ्फूसातले क्लाॅट्स-मेंदूतला रक्तस्त्राव-विषबाधा-सर्पदंश-काही औषधांचा ओव्हरडोस अश्या कारणांमुळं हृदय अचानक थांबतं..माझ्याकडं गेल्या काही आठवड्यांमध्ये कोविडपश्चात चाळीशीच्या आतल्या तिनेक पेशंट्समध्ये फक्त ‘थकवा’ यापलिकडं एकही लक्षणं नसतांनाही ब्लाॅकेजेस सापडले आणि लिगामेंटची शस्त्रक्रिया करायची म्हणून तपासण्या करायला आलेल्या एकाच्या हृदयात ब्लाॅकेजेस आढळले…बरं यातला एक व्यावसायिक खेळाडू होता आणि बाकीचेही नियमित व्यायाम करणारे होते..‘जागरुक नसणं’ हे हृदयविकार लक्ष्यात न येण्याचं मुख्य कारण..
- -श्वास कमी पडणे
- -निष्कारण थकवा असणे
- -मळमळ
- -मानसिक गोंधळ
- -अधूनमधून ठसका
- -भूक न लागणे
- -धडधड
- -कच्ची किवा अतिझोप
पस्तिशीच्या पुढं किमान घरात हृदयविकारांचा इतिहास आहे अश्या लोकांनी तरी अधूनमधून रक्तदाब तपासणे-सहा महिन्यातून एकदा रक्त तपासणे या गोष्टी केल्या पाहिजे..
चांगलं निरोगी शरीर कुणाला नकोय? पण फिट असणं आणि नुसता फिटनेसचा अतिरिक्त आग्रह धरणं यातला फरकही लक्ष्यात घेतला पाहिजे..
तिनेक वर्षांपूर्वी पुण्याचे उपमहापौर रेसकोर्सला जाॅगिंग ट्रॅकवरच हृदयविकारानं कोसळले..
कुतूहल म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना आदल्या दिवशीचं शेड्यूल विचारलं तर ते संध्याकाळी दिवसभर काम-मिटिंग्ज सायंकाळी दोन कार्यक्रम-रात्री दहाला एक लग्न आणि बारा वाजता एक मयत अटेंड करून आले होते..
झोप नाही-पोट साफ नाही-गॅसेस पास नाही..पोटावरचा सगळा लोड छातीवर येणार नाही तर काय?
एक दिवस थोडं उशीरा धावले असते किंवा सुट्टी घेतली असती तर कदाचित आजही ते आपल्यात असते..
दुसरं एक ‘मसल गेन’चं एक फॅड शिरलंय तरुणांमध्ये..
अनेकांना सिद्धार्थसारखं ह्यूज दिसायचं असतं..
सतराशे साठ इंटरनेट साईट्सवर विक्रमी वेळात स्नायू फुगवण्याचे-सिक्स ॲब्स मिळवण्याचे खात्रीशीर (?)उपाय सापडतात पण सत्य हे आहे की अशी कुठलीही जादू अस्तित्वात नाही..चांगला प्रथिनयुक्त आहार-पुरेशी झोप-वेट ट्रेनिंग असं सगळं पाळलं तरी एका मर्यादेपलिकडं थेट चित्रपट ताऱ्यांप्रमाणं किंवा व्यावसायीक शरीरसौष्ठवपटूप्रमाणं मोठाले स्नायू फुगत नाहीत-अनुवंशिकतेचाही मुद्दा असतो..सरसकट नाही पण या क्षेत्रांमध्ये सर्रास स्टिराॅईड्स-हार्मोन्स यांचा वापर केला जातो त्याबद्दल कुणी फारसं बोलत नाही एवढंच..
वस्तुस्थिती ही आहे की,”स्नायू कितपत फुगू शकतात?” याचे नैसर्गिक असे ठोकताळे आहेत,त्यापलिकडं ते मोठे दिसत असतील तर ती Hypertrophy अर्थात अतिवृद्धी किंवा विकृतवृद्धी आहे..वृद्धीबद्दलही माझा आक्षेप नाही,माझा आक्षेप वेळेबद्दल आहे..बाॅलीवूडमध्ये फिटनेसचं दुसरं नाव म्हणून ओळखला जाणाऱ्या ‘अक्षय कुमार’चे आर्म्स कधी बलदंड दिसले नाही किंवा त्याचाकडं तितके शार्प सिक्स पॅक्स नाहीत पण आताच्या नायकांकडे चक्क एट पॅक्स आहेत..असं कसं?
कुणाच्याही डेडिकेशनला अजिबात ना नाही पण केवळ चांगलं सौष्ठव म्हणजे ‘फिटनेस’ नव्हे..
कबड्डीचे खेळाडू-वेटलिफ्टर्स-कोल्हापुरचे पहिलवान बघा..वजन-मसल यांच्या गणितापलिकडं हे कुठल्याही शरीरसौष्ठवपटूपेक्षा कितीतरी फिट असतात..प्रोटिन डाएटचं एक अतिरिक्त खुळ..गरजेपेक्षा कुठलीही गोष्ट कधीही घातक ठरू शकते..झिरो कार्बच्या नादात हेल्दी फॅटला नाकारल्यानं उर्जा कमी पडते-थकवा येतो-चिडचिड होते आणि शेवटी पदरी नैराश्य पडतं..‘सिद्धार्थ शुक्ला’ हे नाव आजवर मी फक्त ऐकून होतो..त्याचं वय ऐकून आणि व्यक्तीमत्व बघून अस्वस्थ वाटलं..सगळेच जाणार आहोत पण ‘या वयात झोपेत हार्ट अटॅक आणि उपचार सुरू होण्याआधीच मृत्यू?’
असं कुणाबाबतच नको व्हायला..
या निमित्तानं काही गोष्टी जाणवल्या म्हणून हा प्रपंच..

©डॉ.प्रज्ञावंत देवळेकर
Credits and copyrights – nashikonweb.com