मुंबई : एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
यातील ११,००८ कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत निलंबिनाची कुर्हाड पडली आहे, तर या अनुषंगाने झालेल्या सुनावण्यांना गैरहजर राहिल्याबद्दल सुमारे ७८३ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच २०४७ एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात कर्मचाऱ्यांसाठी बिकट झाली आहे.
मागील ७० दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे लहानात लहान खेडेगावात जाणार्या, ग्रामीण भागातील स्वस्त वाहतुकीचा पर्याय असलेल्या जीवनवाहिनीला ब्रेक लागला आहे. परिणामी मोठा आर्थिक फटका लोकांना बसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आम्ही वारंवार आगारात जाऊन रुजू करून घेण्याची विनंती केली. मात्र मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतची सूचना नसल्याचे सांगत आगारप्रमुखांनी रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. – निलंबित एसटी कर्मचारी, औरंगाबाद विभाग
संपातील निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना तीन वेळा रुजू होण्याची संधी देण्यात आली होती. मात्र कर्मचारी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. आता या निलंबित कर्मचाऱ्यांना रुजू होता येणार नाही. – शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ