पुणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी तीन बैठका घेतल्या. परंतु या बैठकीत वाटाघाटी झाल्या नाहीत. ग्रामीण भागातील प्रवासी अडचणीत सापडले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. खाजगी वाहतूकदार प्रवाशांची पिळवणूक करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छोटे ऑपरेशन झाल्यामुळे ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी चुकीची भूमिका न घेता जरा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात एका शासकीय कार्यक्रमानिमित्त ते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. अब्दुल सत्तार म्हणाले, एसटी सुरू होणे गरजेचे आहे.
एसटी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये. हा वाद एसटी कामगार आणि सरकारमध्ये आहे. सरकार मध्यस्थी करून जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे.
परंतु गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत संपात तेल टाकण्याचे काम करत आहे. त्यांनी असं करू नये. त्यांचीही पाच वर्षे सत्ता होती. तेव्हा त्यांनी एसटी कामगारांना सरकारमध्ये सहभागी का करून घेतले नाहीत असा प्रश्न लोक विचारत आहेत. सत्तार पुढे म्हणाले, एसटी कामगारांच्या भावनांशी मी देखील सहमत आहे. त्यांच्या अनेक अडचणी आहेत, पगाराचा प्रश्न आहे.
परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाहीत, कॅबिनेटची बैठकित निर्णय होत नाही तोपर्यंत निर्णय घेण्याचा अधिकार मंत्र्याला नाही. हा निर्णय धोरणात्मक निर्णय आहे. एका महामंडळ सरकारमध्ये समाविष्ट केले तर अशा अनेक महामंडळाचा प्रश्न निर्माण होईल. त्यानंतर सरकारसमोर अनेक अडचणी उभ्या राहतील. त्यानंतर उत्पन्न आणि पगारावर होणारा खर्च पाहिला तर विकासासाठी पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुख्यमंत्री तंदुरुस्त झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे प्रमुख मिळून या मुद्द्यावर कॅबिनेटमध्ये अंतिम तोडगा काढतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
स्रोत : रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.