गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील गणेशोत्सवावर (Ganeshotsav) कोरोनाचे संकट असून, या काळात मुंबईमधील गणेशभक्तांकरिता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता मुंबईतील गणेशभक्तांना लालबागमधील सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहता येणार नाहीत. लालबागमधील सगळ्याच गणेश मंडळांची मुंबई पोलीस व पालिका अधिकाऱ्यांशी नुकतीच बैठक पार पडली असून, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव काळात लालबागमधील गणपतींचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. एबीपीने याबाबत वृत्त दिले आहे.
गणेश मंडळांना हे आदेश देण्यात आले
कोरोना स्थिती आटोक्यात आली असली, तरीही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारमार्फत खबरदारी घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवामध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये याकरिता सातत्याने प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्याकरिता लालबागमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येत असतात. त्यामुळे गर्दी होत असते. लालबागमध्ये लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी अशी बरीच गणेश मंडळे आहेत. तिथे असणाऱ्या उंच मूर्ती पाहण्याकरिता गणेशभक्त नेहमी गर्दी करत असतात, तर यंदा मात्र या मूर्ती चार फुटांच्या असणार आहेत. मूर्तीची उंची कमी असली, तरी लालबागमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन कोणत्याही मंडळाच्या गणेशाचे दर्शन बाहेरून येणाऱ्या गणेशभक्तांना घेता येणार नाही, मात्र या भागातील रहिवासी, स्थानिकांना हे दर्शन घेता येणार आहे. मंडळांमार्फत गणेशभक्तांकरिता ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलीस व सार्वजनिक मंडळांमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली.
शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवनही अडचणीत आणत आहेत
“महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही सणांच्या विरोधात नाही, तर कोरोनाच्या विरोधात आहे. केंद्रातील मोदी सरकारने सणांच्या काळामध्ये संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करत काळजी घेण्यास आणि गर्दी रोखण्याकरिता आवश्यक निर्बंध घालण्यास राज्य सरकारला सांगितले.” याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले होते. “कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, केंद्र सरकारनेदेखील तसे सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी व गणेशोत्सव काळामध्ये गर्दी टाळावी, अशी सूचना राज्याला पत्र पाठवून केली आहे. जे आंदोलन करू इच्छित आहेत त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे. आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्या लोकांचे जीवनही अडचणीत आणत आहेत,” असेही ठाकरे यांनी सुनावले होते.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.