मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेचा ‘बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील ‘यशराज प्रेरणा’ ह्या युवा संघटनेला जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार वितरण बॅ. नाथ पै यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी आचरे येथे संपन्न होणार आहे. सदर पुरस्कार वितरण बॅ. नाथ पै यांचे जवळचे स्नेही आदरणीय बाबूकाका अवसरे (मालवण) यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी मा.रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग़ जिल्हा परिषद सिंधुदुर्ग), मा. लक्ष्मिकांत खोबरेकर (सचिव, बॅ. नाथ पै सेवांगण मालवण), सुजाता सुनिल टिकले (कथामाला कार्यकर्ती), प्रणया टेमकर (सरपंच आचरे) आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सदर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पांडुरंग गुरुदास कोचरेकर (कथामाल मालवण) यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हे वर्ष बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. लोकशाहीचे कैवारी, कोकण रेल्वेचे प्रेरणास्थान, उत्कृष्ट संसदपटू आदी अनेक बिरुदे लाभलेल्या ह्या लोकनेत्याला युवक आणि युवती यांच्याबद्दल नितांत आदर होता. प्रत्येक देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ हा त्या देशातील युवकांच्या सळसळत्या धमन्यांवर अवलंबून असतो. युवकांना योग्यवेळी प्रोत्साहन दिले तर ते देश बदलू शकतात. देशात ख-या अर्थाने क्रांती घडवून आणू शकतात असे बॅ. नाथ पै यांचे मत होते. आणि म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात साने गुरुजी कथामालेच्या वतीने सुजाता टिकले (कणकवली) यांनी हा पुरस्कार प्रायोजित केला होता. या पुरस्काराची निवड समिती मार्फत करण्यात आली. सदर संस्थेची कथामालेमार्फत निवड केली.
‘यशराज प्रेरणा’ ही युवा संघटना गेली सात-आठ वर्षे आचरे पंचक्रोशीत शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण प्रबोधन, आपद् ग्रस्तांना मदत, सांस्कृतिक, क्रीडा, अध्यात्मिक आदी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. कोरोना आपद्ग्रस्त कालावधीत वरील संघटनेने अनेक उपक्रम घेवून सामाजिक भान राखले आहे. “सेवा तेथे युवा” हे त्या संघटनेचे ब्रिदवाक्य असून त्या ब्रिदवाक्यानुसार त्यांची वाटचाल चालू आहे.
सदर युवा संघटनेचे अभिनंदन करताना सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष, साने गुरुजी कथामाला मालवण) म्हणाले, “बॅ. नाथ पै यांचे साने गुरुजी कथामालेशी आणि प्रकाशभाई मोहाडीकरांशी फारच निकटचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. बारामती येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अधिवेशनात बॅ. नाथ पै उपस्थित होते. आणि ते अधिवेशन महाराष्ट्राचे वाल्मिकी – ग. दि. माडगुळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते. त्या विषयीची आठवण आदरणीय यदुनाथ थत्ते यांनी आपल्या भाषणात सांगितली होती. त्यामुळे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला नाथ पै युवाशक्ती पुरस्कार यशराज प्रेरणा युवा संघटनेला मिळत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे.”
सदर पुरस्काराबाबत आपल्या प्रतिक्रिया देताना ‘मंदार सरजोशी’ (अध्यक्ष, यशराज प्रेरणा युवा संघटना) म्हणाले, “बॅ. नाथ पै यांच्या नावाचा साने गुरुजी कथामालेचा युवाशक्ती पुरस्कार आम्हाला जाहीर झाला हे ऐकून आम्ही सर्व कार्यकर्ते रोमांचित झालो. आम्ही गेली सहा सात वर्षे एक ‘समाजाचे देणे’ ह्या नात्याने एकत्र येवून हे कार्य करीत आहोत. आज वरील पुरस्काराने आम्हाला आणखी जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे. बॅ. नाथ पै पुरस्काराची शान आणि मान उंचावण्यासाठी आपल्या ‘यशराज प्रेरणा’ युवा संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता जबाबदारीपूर्वक काम करेल.”
यशराज प्रेरणा युवा संघटनेला कथामालेचा ‘नाथ पै पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.