वर्धा : ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था ही गावकऱ्यांचे आपल्या पशुंवर असणारे प्रेम व दुधाच्या उत्पादनातून जोपासली जात आहे. त्यामुळे दुध उत्पादन वाढविण्यासोबतच दुधाला चांगला भाव आणि बाजारपेठ मिळवून देणार असल्याचे पालकमंत्री तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येते अल्लीपूर शंकरपट व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित किसान शंकरपटाचा शुभारंभ पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजु तिमांडे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक घारफळकर, मनोज चांदुरकर, बाळाभाऊ शहागडकर, अल्लीपुरचे सरपंच नितीन चंदनखेडे, अमोल गायकवाड, श्रीराम साखरकर आदी उपस्थित होते.
शंकरपट हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा पारंपरीक खेळ आहे. बंदी असल्याने हा खेळ गेल्या सात वर्षांपासून बंद होता. न्यायालयात राज्य शासनाने सकारात्मक आणि प्रभावीपणे बाजू मांडल्याने न्यायालयाने शंकरपटास परवाणगी दिली आहे. शेतकरी आपल्या पशुंवर प्रेम करतो. पशुप्रेमींची भुमिका तो बजावत असतो.
ग्रामीण भागातील आर्थीक व्यवस्था शेतकऱ्यांच्या पशुप्रेमातून जोपासली जाते. अनेक गावात मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेतीसोबतच दुधाचाही व्यवसाय करतात. शेतकऱ्यांच्या या दुधाला चांगला भाव मिळणे आवश्यक आहे. सोबतच दुधाला चांगली बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे पालकमंत्री केदार पुढे बोलतांना म्हणाले.
न्यायालयाने नियमांचे पालन करत शंकरपटाला परवानगी दिल्याने अल्लीपुर येथे पशुपालकांनी मोठ्या उत्साहात शंकरपटाचे आयोजन केले होते. यावेळी पशुपालक उपस्थित होते.