ठाणे : ठाण्यातील गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेली आपला दवाखाना संकल्पना पूर्णत: सुरू होण्याआधीच शहरातील विविध ठिकाणी फलकबाजी सुरू केली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधी विभाग शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेने ५० आपला दवाखाना सुरू करण्याचा घाट दोन वर्षांपूर्वी घातला. काही महिन्यांपूर्वी १८ आपला दवाखाने सुरू करण्यात आले आणि जून-जुलै मध्ये प्रलंबित बिलामुळे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली. आता पुन्हा १८ दवाखाने सुरू झाले असले तरी शहरातील विविध ठिकाणी ५० आपला दवाखाने उपलब्ध असल्याची जाहिरात फोल ठरत आहे.
ठाण्यातील गरजूंना आरोग्याच्या सेवा वेळेत आणि मोफत मिळाव्यात, यासाठी दिल्लीच्या मोहल्ला क्लीनिक या संकल्पनेवर आधारीत ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी आपला दवाखान्याची संकल्पना राबविली. प्रायोगिक तत्वावरील दोन दवाखान्याचा प्रयोग फसला असतानाही पन्नास दवाखाने चालू करण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले. सध्याच्या घडीला किसननगर, खोपट, रामनगर, कळवा, मुंब्रा, दिवा, लोकामान्यनगर, राबोडी, ब्रह्मांड, मानपाडा, आनंदनगर, कोपरी अशा ठिकाणी १८ दवाखाने सुरू करण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत रुग्णांना मोफत औषध उपचार तसेच ईसीजी, यूरिन टेस्ट तसेच ब्लड शुगर टेस्टिंग हे मोफत करून दिले जाणार होते तसेच प्राथमिक औषधोपचारही मोफत देण्यात येणार होते. यासाठी महानगरपालिका प्रति रुग्णाच्या मागे दीडशे रुपये दर ठेकेदाराला देणार होती. व दररोज किमान १०० रुग्णांची चाचणी औषध उपचार ठेकेदाराकडून करणे अपेक्षित होते पण तसे अद्यापही झाले नाही. सध्या सुरू असलेल्या दवाखान्यामध्ये चाचणी केली जात नसून केवळ प्राथमिक उपचार केले जात आहेत. शिवाय सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत हा आपला दवाखाना सुरू असतो.
दरम्यान ठाण्यातील आपला दवाखाना हे १८ सुरू झाले असून उर्वरीत दवाखाने टप्या टप्याने सुरू होणार आहेत. सध्या इतर दवाखान्याचे कराराबाबतचे काम सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. ५० दवाखाने सुरू होण्याआधी महापौरांनी शहरातील विविध ठिकाणी ५० दवाखाने उपलब्धतेची जाहिरातबाजी केली आहे. पण प्रत्यक्षात केवळ १८ दवाखाने सुरू करण्यात आले असून फलकबाजीवर पैसे खर्च करण्याऐवजी हा निधी विकासकामांना तसेच दवाखाने लवकर सुरू करण्यासाठी खर्च करावा, अशी मागणी स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.