ठाणे : ठाणे महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मिळाल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के आणि विभागाचे प्रमुख संजय हेरवाडे यांना देण्यात आली नव्हती. त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप महासभेत करण्यात आल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचे चित्र दिसून आले.
शहरात शौचालयांची दुरुस्ती होत नाही, कचऱ्याची ढीग ठिकठिकाणी साचले आहेत, मग हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी खोटी माहिती देण्यात आली कि काय असा प्रश्न शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी सभागृहात उपस्थित केला. तर पुरस्कार स्वीकारण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी गेले मात्र नेमका हा विभाग कोणाकडे आहे अशी विचारणा देखील त्यांनी केली. स्वच्छ सर्व्हेक्षणाचा अहवाल आपण केला असला तरी, पुरस्काराबद्दल आपल्याला कल्पना असल्याचे उत्तर हेरवाडे यांनी यावेळी दिले. त्यानंतर रेपाळे यांना यासंदर्भात देखील कल्पना देण्यात आली नव्हती का अशी विचारणा त्यांनी केली आणि या वादाला तोंड फुटले.
महापौर आणि विभाग प्रमुखांना ठेवले अंधारात
विकास रेपाळे यांच्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी पुन्हा एकदा तत्कालीन आयुक्तांच्या कार्यकाळात जी प्रथा सुरु करण्यात आली होती, तीच पुन्हा सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी देखील प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करत २०१४ सालापासून जे राजकारण सुरु झाले ते पुन्हा सुरु झाले असून नगरसेवकांना कोणत्याही प्रकारची किंमत दिली जात नाही याचे हे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारणे हा महापौरांचा अधिकार असून असा प्रकार महापालिकेत कधीच झाला नसून त्यांनी या सर्व गोष्टीचा निषेध केला.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
या गरमागरमीनंतर महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. अधिकारी एसीमध्ये बसून केवळ आयुक्तांच्या पुढे पुढे करण्याचे काम करत असतात. मात्र लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यात पुढे असतात. निधी नसला तर वेळप्रसंगी खिशातले पैसे टाकून काम करून घेतात. मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय प्रशासनाने स्वतःकडे घेऊ नये. सन्मान खरा लोकप्रतिनिधी आणि सफाई कर्मचाऱ्यांचा असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामे उभी राहत होती तेव्हा अधिकारी कुठे गेले होते? जे मागील पाच वर्षात केले ते पुन्हा करून नका, संघर्ष मी टाळला असला तरी, जसे प्रशासनाला डोक्यावर घेतले तसे खाली सुद्धा खेचू शकतो, झाकली मूठ उघडायला लावू नका असा गर्भित इशाराच त्यांनी प्रशासनाला यावेळी महापौरांना दिला.
अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव…
स्वच्छ सर्वेक्षण संदर्भात महापौर यांच्यापासून माहिती लपवण्यात आली असल्याने ही गंभीर बाब असल्याचे सभागृह नेते अशोक वैती यांनी सांगितले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त, सचिव आणि अन्य संबंधित अधिकारी ज्यांनी ही माहिती लपवली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. तसा ठराव देखील वैती यांनी सभागृहात मांडला.
ज्यांच्यावर स्वच्छ सर्व्हेक्षणाची जबाबदारी होती ते अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना पुरस्काराबाबत काहीच माहिती नसल्याची कबुली त्यांनी स्वतः सभागृहात दिली. त्यामुळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी गेले. यावरून एकीकडे लोकप्रतिनिधीनी प्रशासनाकडे बोट दाखवले आहे तर दुसरीकडे यामुळे अधिकाऱ्यांमधील गटबाजी देखील पुन्हा एकदा उघड झाली आहे.
स्रोत – ठाणे वैभव
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.