ठाणे : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु असताना पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपा-मनसे एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे.
दोन्ही पक्षांमध्ये जागांसंदर्भात महत्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपा खासदार कपील पाटील यांनी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील १५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्ह्यतील १४४ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होत असून बहुतेक उमेदवारांची प्रचाराची पहिली फेरी संपली आहे. कपील पाटील यांनी सोमवारी रात्री उशीरा पत्रकारांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली.
एकमेकांच्या बालेकिल्ल्यात देणार नाहीत उमेदवार
भाजपा-मनसेमध्ये थेट युती झाली नसली तरी आम्ही जागांसंदर्भात चर्चा केली असून जागा व्यवस्थापनाबद्दल दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. ज्या ठिकाणी भाजपाचा प्रभाव जास्त आहे तिथे मनसे उमेदवार देणार नाही आणि जिथे मनसेचा दबदबा आहे तिथे भाजपा उमेदवार देणार नाही असं निश्चित करण्यात आल्याचं कपील पाटील म्हणाले आहेत. विकास आणि चांगल्या कामांसाठी मनसे सोबत जाण्यास काय हरकत आहे?, असा प्रश्न कपील पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नक्की किती जागांवर भाजपा-मनसेने ही अॅडजेस्टमेंट केलीय हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून येत्या काळात हे स्पष्ट होईल असं पाटील म्हणालेत. पालघरचे मनसेचे प्रमुख अविनाश जाधव यांनी भाजपा आणि मनसे एकमेकांविरोधात उमेदवार देणार नाही असं सांगितलं आहे.
पोटनिवडणुकीसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननी प्रक्रियेदरम्यान त्यापैकी दोन अर्ज बाद ठरवण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी ७४, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० अर्ज कायम आहेत. निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसतर्फे बहुतांश सर्वच जागांवर उमेदवारी दाखल करण्यात आली असून, बहुजन विकास आघाडी व कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवारदेखील रिंगणात आहेत. यामुळे निवडणुका अनेक ठिकाणी बहुरंगी होणार आहेत.
उमेदवारी अर्ज करायच्या अखेरच्या दिवसापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता आठवडय़ाभराचा अवधी लाभल्याने हा वेळ वाया न दवडता बहुतांश सर्व उमेदवारांनी आपल्या मतदार क्षेत्रामध्ये प्रचाराचा पहिला दौरा पूर्ण केला आहे. उमेदवारांना आपले निवडणूक चिन्ह तसेच मतदान प्रक्रियेतील क्रमवारी प्राप्त झाली नसल्याने मतदारांना देण्यात येणारे छापील साहित्य अजूनही तयार झाले नसल्याने वैयक्तिक भेटीगाठी, परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. तसेच गाव पाडय़ावरील समूहांच्या बैठका घेण्याचे, मोटरसायकल रॅली काढण्याचेदेखील काही भागांमध्ये सुरू झाले आहेत.
या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचार करण्यासाठी अवघ्या आठवडाभराचा अवधी मिळणार असल्याने तसेच मतदारसंघ विखुरलेले असल्याने सर्वच ठिकाणी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांंची गरज भासत आहे. या भागात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असल्याने मतदारांपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरत आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या या कालावधीत पंचायत समितीच्या १४ जागांसाठी २२ उमेदवारांनी, तर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी ५१ उमेदवारांनी उमदवारी अर्ज मागे घेतले असून जिल्हा परिषदेसाठी ७४, तर पंचायत समितीसाठी ७० उमेदवार रिंगणात आहेत.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.