नवी मुंबई : प्रशासनात अनेक चांगले उपक्रम आणि इतरांना मार्गदर्शक कामे उभी राहतात. परंतु याबद्दलची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल माध्यमांत गैरसमज होतो. प्रशासनातील कार्यसंस्कृती आणि प्रसार माध्यमे यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे, असे उदगार साम टिव्हीचे संपादक प्रसन्न जोशी यांनी काढले.
कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ कोकण भवन शाखा यांच्या विद्यामाने आज संवाद कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात ते बोलत होते. यावेळी दैनिक सकाळ मुंबईचे संपादक संदीप काळे यांनीही अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
श्री. जोशी म्हणाले की, प्रशासनाने सोप्या पध्दतीने प्रसार माध्यमांना माहिती पुरविली तर माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात येणाऱ्या माहितीच्या अर्जांचे प्रमाण कमी होतील. प्रशासनाने पत्रकारांशी संवाद साधून त्यांना परिपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांनी सुध्दा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतूक करणेही गरजेचे आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासारख्या शासकीय खात्यांनी प्रशासन व प्रसार माध्यमांचे परिसंवादाचे कार्यक्रम यापुढेही असेच घ्यावेत. असेही त्यांनी सुचविले.
समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम प्रसार माध्यमे करीत असतात. माध्यमांनी मांडलेले सामाजिक प्रश्न सोडविण्याची भूमिका शासन नेहमीच बजावते. प्रसार माध्यमे ही खऱ्या अर्थाने समाजमनाचा आरसा दाखविण्याचे काम करतात. या परिसंवादातून प्रशासन व प्रसार माध्यमे यामधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
संदीप काळे यांनी ते स्वत: दैनिक सकाळमध्ये लिहित असलेल्या सदराबद्दलचे त्यांना आलेले अनुभव मांडले. नियमित सदर लिहितांना येणाऱ्या अडीअडचणी व त्यातून होणारे समाजकार्य याबद्दलची माहिती दिली. पत्रकारिता करतांना माणूसकीही जपली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी नेहमीच विकास पत्रकारिता केली पाहिजे. विकास पत्रकारिता करतांना प्रशासनाच्या माहितीसाठयाची मोठी मदत होते. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांनी संकोच न बाळगता संवाद साधला, तर खरी माहिती मिळू शकते. यातून विधायक पत्रकारिता करता येऊ शकते. याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी विषद केली.
यावेळी उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, राज्यकर उपायुक्त डॉ.विलास नागरगोजे, सहाय्यक आयुक्त मनिषा देवगुणे राज्यकर उपायुक्त रामोजी ठोंबरे, उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, तहसिलदार माधुरी डोंगरे, कमलेश नागरे, अस्मिता जोशी आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.