ठाणे : शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना मोकळे सोडले जात आहे, अशा शब्दांत भाजपाचे आमदार संजय केळकर आणि आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे.
सत्ताधाऱ्यांचे पितळ उघड करण्याबरोबरच ठाणेकरांना चांगले रस्ते मिळण्यासाठी भाजपा रस्त्यावर उतरला आहे, असे दोन्ही नेत्यांनी नमूद करीत सत्ताधारी व प्रशासनावर दबाव व अंकुश ठेवणार असल्याचे जाहीर केले. ठाणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडल्याने वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचे म्हणत भाजपाचे आमदार संजय केळकर आणि आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध रस्त्यांची आज पाहणी केली. या दौऱ्यात महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेविका प्रतिभा मढवी, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा व नगरसेविका मृणाल पेंडसे, सरचिटणीस मनोहर सुखदरे, राजेश मढवी, भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या दौऱ्यात तीन हाथ नाका, ज्ञानेश्वर नगर नाका, बाळकुम-कापूरबावडी रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर सिग्नल व कासारवडवली सिग्नल, कळवा, मुंब्रा आदी भागातील रस्त्यांची पाहणी केली. तसेच खड्डेदुरुस्तीची पाहणी करीत निकृष्ट कामाकडे लक्ष वेधले.
आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी हाती घेतले कुदळ-फावडे
ठाणे शहर ऐतिहासिक व नावारूपाला आलेले शहर आहे. मात्र, स्मार्ट सिटीऐवजी सत्ताधाऱ्यांची बनवाबनवी सुरू असून, शहर विद्रूप करण्याचे काम सुरू आहे. निकृष्ट रस्त्यांमुळे लगेचच खड्डे पडले. मात्र, दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराला पाठिशी घातले जात आहे. थीम पार्कवर ३३ कोटी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेने ठाणेकरांना चांगले रस्ते दिलेले नाहीत, अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली. रस्त्यावरील डांबर गेले कुठे, असा सवालही केला. ठाणे महापालिकेत मोठा भ्रष्टाचार असून, खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत.
नालेसफाईप्रमाणेच खड्ड्यांमध्येही भ्रष्टाचार असून, दोन नागरिकांचे बळी गेल्यानंतरही महापालिकेला जाग येत नाही, हे दुर्देव आहे, अशी टीका आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. खड्डे दाखवा अन्, बक्षीस मिळवा, अशी स्पर्धा घेतल्यास ठाणेकरांना कोट्यवधी रुपये मिळतील, अशी टीकाही आमदार डावखरे यांनी केली. ठाणेकरांच्या नाराजीनंतर खड्डेदुरुस्तीची केवळ थातूरमातूर कामे करून धुळफेक केली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी स्वत: फावडे-कुदळ घेत काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली. तसेच निकृष्ट कामाकडे सत्ताधारी व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.