ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये छायाचित्रांसह मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. १ नोव्हेबर २०२१ पासून १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनीधींची बैठक आज जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
सध्या जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या निरंतर पुनरिक्षण मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र मिळविण्यासाठी तसेच दुबार किंवा समान नोंदी कमी करणेसाठी व मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण आदी बाबींसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी येथे केले.
राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीत ते बोलत होते. निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना कदम, शिवसेनेचे विलास जोशी, अनिल भोर, अमोल नवले, भारतीय जनता पक्षाचे कैलास म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नैनेश पाटणकर, बहुजन समाज पार्टीचे जमना कोरी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये ६ लाख ११ हजार मतदारांचे छायाचित्राशिवाय नाव आहे. अशा याद्यांची तपासणी केली जात असून मतदारांनी आपले छायाचित्र उपलब्ध करून द्यावे. यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करतानाच ज्या मतदारसंघाच्या मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या अधिक आहे तेथे बीएलए (बुथ लेव्हल एजंट ) नेमण्याची कार्यवाही सर्व राजकीय पक्षांनी करावी, असे श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्कीक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेट देऊन तपासणी करणे, योग्य प्रकारे विभाग, भाग तयार करून मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मतदारांनी मतदारयादीतील आपले नाव, छायाचित्र याबाबत ३१ ऑक्टोबर पूर्वी तपासणी करून घ्यावी. ज्यांची नावे आहेत मात्र छायाचित्र नाही आणि तपासणी दरम्यान संबंधीत व्यक्ती त्या ठिकाणी वास्तव्यास नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदारयादीमध्ये असल्याची खात्री nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन करावी. जर आपले नाव मतदारयादीमध्ये नसेल किंवा वगळण्यात आले असेल तर १ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये नमुना ०६ भरुन नोंदणी करावी. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान नोंदणी केलेल्या मतदारांची पुरवणी यादी ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. आगामी सन २०२२ मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका/नगरपालिका/नगर पंचायत यांच्या निवडणूकींच्या अनुषंगाने सदर मतदारयादीच्या कार्यक्रमास महत्व प्राप्त झााले आहे.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.